पिंपरीः पनवेल महापालिकेत नोकरी लावतो, असे सांगून चार लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. संदीप मारुती पांडव (वय – ३०, रा. ऐरोली, नवी मुंबई), जगन्नाथन बालकृष्ण (वय ३७, रा. जुईनगर, ठाणे), नितीन महादू वाघ (३८, रा. नवी मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नागेश तानाजी जगताप (वय ३२, पंचवटी कॉलनी, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल पालिकेतील भरारी पथकात नोकरी लावतो, असे सांगून आरोपींनी फिर्यादी जगताप यांच्याकडून साडेपाच लाख रूपये घेतले. प्रत्यक्षात नोकरी लावली नाही. तसेच जगताप यांना पनवेल पालिकेचे खोटे ओळखपत्र तयार करून देण्यात आले. काही दिवसांनी दीड लाख रूपये आरोपींनी परत केले. मात्र, उर्वरित चार लाख रूपयांची फसवणूक केली, अशी तक्रार जगताप यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.