पीएमपीच्या कोथरूड डेपोतून मंगळवारी चोरीला गेलेले ई-तिकिटांचे यंत्र शनिवारी डेपोतच टाकून दिलेल्या स्थितीत आढळले. डेपोमधून यंत्र चोरीला गेल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती, ही बाबही आता उघडकीस आली असून पीएमपीचे वरिष्ठ अधिकारीच ई-तिकीट यंत्रांच्या घोटाळ्यात सहभागी असल्याची तक्रार पीएमपी प्रवासी मंचने केली आहे.
पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी आणि सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी ही तक्रार प्रशासनाकडे केली असून या यंत्रणेमधील अनेक गैरप्रकारांकडे त्यांनी पीएमपीचे लक्ष वेधले आहे.
पीएमपीच्या ई-तिकीट यंत्रांमध्ये सातत्याने घोटाळे केले जात आहेत. प्रत्यक्ष मार्गावर काम करत असताना अनेक वाहक बनावट यंत्रे वापरून त्या यंत्रांमधील तिकिटे प्रवाशांना देतात आणि येणारी सर्व रक्कम लाटतात असेही प्रकार उघडकीस आले आहेत.  स्वारगेट आणि भोसरी डेपोंमधील ई-तिकीट यंत्रांमधील गैरप्रकारांबाबत पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रारीही दाखल आहेत. यंत्रांचा दर्जा अत्यंत सामान्य असून ती प्रत्यक्ष वापरात असताना बंद पडणे, बॅटरी जळणे, तिकीट छपाई होऊन बाहेर न येणे, अशा अनेक तक्रारी असल्याचे राठी यांनी म्हटले आहे. संबंधित यंत्रणेचा सव्र्हर काम करत नसल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील तिकीट विक्रीची माहिती अद्यापही मिळत नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
एकापेक्षा अधिक तिकिटे (ग्रुप बुकिंग) घेतल्यानंतरही एकच तिकीट देण्याऐवजी प्रत्येक तिकीट वेगळे दिले जात असल्यामुळे पीएमपीचे आतापर्यंत कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण जेवढी तिकिटे मशिनमधून प्रिंट होतात त्यानुसार तेवढी रक्कम संबंधित कंपनीला मिळते. त्यामुळे ग्रुप बुकिंग असल्यास एकच तिकीट द्यावे अशी अट करारात असतानाही तशी यंत्रणा संबंधित कंपनीकडून उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे होणारे नुकसान का विचारात घेतले जात नाही, असाही प्रश्न राठी यांनी उपस्थित केला आहे.
ई-तिकीट यंत्रणेतील गैरव्यवहार पाहता संबंधित कंपनीच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार करावी, कंपनीबरोबरचा करार तातडीने रद्द करावा तसेच झालेले नुकसानही कंपनीकडून भरून घ्यावे आणि या गैरप्रकारांमध्ये जे पीएमपीचे अधिकारी सहभागी होत आहेत त्यांच्याविरुद्धही रीतसर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा