लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दहा उमेदवारांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या उमेदवारांनी बीडमधील जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या नावे प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक युवराज मोहिते यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी उमेदवार साेमीनाथ सुधाकर कंटाळे (रा. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड), अजय बभ्रुवान जरक (रा. टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर), अक्षय बाळासाहेब बडवे (रा. सोमनाथनगर, कोंढवा बुद्रुक), दिनेश अर्जुन कांबळे (रा. ब्रह्मगाव, जि. बीड), राजेश रमेश धुळे (रा. नांदेड), अमोल विठ्ठल गरके (रा. बेंबर, ता. भोकर, जि. नांदेड), धृपद प्रल्हाद खारोडे (रा. वाकड, ता. भोकर, जि. नांदेड), गोविंद भक्तराज मिटके (रा. शिवणगाव, ता. उमरी, जि. नांदेड), आसाराम बाळासाहेब चौरे (रा. जिवाचीवाडी, ता. केज. जि. बीड), हेमंत विठ्ठल निकम (रा. दत्तविहार, वाघोली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या शोधासाठी दहा पथके; तपासाची धुरा सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे

पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया २०२१ मध्ये राबविण्यात आली होती. भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भरतीसाठी सादर केलेल्या शैक्षणिक आणि अन्य कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलाविण्यात आले होते. भरतीप्रक्रियेत आरक्षणनिहाय कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेकडे सोपविली होती.

सोमीनाथ कंटाळेसह दहा उमेदवारांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात बीड येथील प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेकडून पडताळणी करण्यात आली तेव्हा त्यांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार फसवणूक केल्याप्रकरणी १० उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव तपास करीत आहेत.

ग्रामीण पोलीस दलातील भरतीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. बीड जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती मागविण्यात आली. तेव्हा १० उमेदवारांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले. -युवराज मोहिते, पोलीस उपअधीक्षक (गृह), पुणे ग्रामीण

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in police recruitment through fake certificate of project victim pune print news rbk 25 mrj