ऑस्ट्रेलियात नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला असून या प्रकरणी जे.एस.सी ओव्हरसीज कन्सल्टंट या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत पाच तरुणांची फसवणूक झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. या प्रकरणी या कंपनीचे संचालक वरुण जोगळेकर आणि डॉ. स्नेहा जोगळेकर यांच्या विरोधात कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परदेशात नोकरीची संधी अशी जाहिरात वाचून तक्रारदार तरुणाने जे.एस.सी ओव्हरसीज कन्सल्टंटचे डॉ. जोगळेकर यांच्याशी संपर्क साधला होता. वेगवेगळ्या पदावर नोकरीची संधी असल्याचं सांगून डॉ. जोगळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. तक्रारदार तरुणासह त्याच्या मित्रांकडून सहा लाख रुपये घेण्यात आले होते. जोगळेकर यांनी त्यांना बनावट व्हिसाही दिला होता.

नोकरीबाबत तरुणांनी विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात होती. तरुणाने जोगळेकर यांच्याकडे पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी तरुणाला धमकावले. खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकीही त्याला देण्यात आली. फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

कशी झाली फसवणूक?

तरुणांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात ऑस्ट्रेलियात नोकरी मिळवून दिली जाईल. तरुणांनी ज्या विद्याशाखेत शिक्षण घेतलं आहे, त्याच स्वरुपाची नोकरी मिळवून दिली जाईल, असंही सांगण्यात आलं होतं. डॉ. जोगळेकर यांनी प्रत्येकी ११ लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं. दोन लाख दिल्यावर व्हिसा मिळेल, चार लाख दिल्यावर विमानाचं तिकीट मिळेल आणि उर्वरित पाच लाख नोकरी लागल्यानंतर वेतनातून कापून घेतले जातील, असं जोगळेकर यांनी या तरुणांना सांगितलं होतं. डॉ. जोगळेकर यांनी तरुणांना मेरीटाईम व्हिसा मिळवून दिला होता. या व्हिसाचा वापर फक्त बंदरांसाठी होतो. नोकरीसाठी असणारा व्हिसा वेगळ्या असल्याने तरुणांना संशय आला. त्यांनी ऑस्ट्रेलियन दूतावासाच्या संकेतस्थळावर मेलद्वारे चौकशी केली, तेव्हा फसवणूक झाल्याचे उघड झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in the name of job in australia pune 2 people arrested pune print news vsk