लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शहरातील एका व्यावसायिकाची एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनुप्रीत ओरसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आदित्य कमलेश श्रीवास्तव (वय २६, रा. विमाननगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीवास्तव यांची मार्केट वेब जेन कंपनी आहे. या कंपनीकडून उत्पादनांचे विपणन केले जाते. आरोपी ओरसेने श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला होता. माझ्या कंपनीकडून देशासह परदेशात विपणनाचे काम केले जाते. आमच्या कंपनीचे काम मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने काही काम तुम्हाला देतो, असे ओरसेने श्रीवास्तवला सांगितले.
आणखी वाचा-पुणे: मैत्रीच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणाऱ्या महिलेवर गुन्हा
श्रीवास्तवला व्यावसायिक कामासाठी ४० टक्के परतावा देण्याचे आमिष ओरसेने दाखविले होते. त्यानंतर श्रीवास्तव यांनी त्याला २३ लाख ३२ हजार रुपये दिले. ओरसे याने श्रीवास्तव यांच्याकडील रक्कम, तसेच केलेल्या कामाचे पैसे परत केले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीवास्तव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.