पुणे : काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी पाषाण भागातील एका महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादर महिला पाषाण भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी २ जानेवारी रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई गुन्हे शाखेकडून काळ्या पैसे व्यवहारात कारवाई करण्यात येणार आहे. महिलेच्या बँक खात्याचा वापर व्यवहारांसाठी करण्यात आला असल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. त्यानंतर याप्रकरणात अटक टाळण्यासाठी (डिजिटल ॲरेस्ट) तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने चोरट्यांच्या खात्यात १३ लाख २३ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : खासगी कंपनीतील रोखपालाकडून दोन कोटींचा अपहार

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

पाषाण भागातील आणखी एकाची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून १७ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांना गेल्या वर्षी मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सुरुवातीला तक्रारादाराने रक्कम गुंतविली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने तक्रारदाराने आणखी रक्कम गुंतविली. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देणे बंद केले.

‘डिजीटल ॲरेस्ट’च्या नावाने फसवणुकीचे वाढते प्रकार

वेगवेगळी आमिषे, तसेच तपास यंत्रणांकडून कारवाईची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन फसवणूक करण्याचे प्रकार वाढते आहेत. नागरिकांनी चाेरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – पुणे : मोटारीची काच फोडून साडेदहा लाखांची रोकड चोरी, विमाननगर भागातील घटना

गृहकर्जाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

बाणेर भागातील एका तरुणीची गृहकर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने चोरट्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीने गृहकर्ज मिळवण्यासाठी एका बँकेच्या पोर्टलवर संपर्क साधला होता. त्यानंतर दर्शन तुकाराम पराते नावाने तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात आला. तरुणीने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्याने तरुणीला आधारकार्ड, तसेच बँकेची कागदपत्रे पाठविण्यास सांगितली. तरुणीने तिच्या बँक खात्याची माहिती पाठविली. त्यानंतर चोरट्याने तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ३५ लाखांचे गृहकर्ज मंजूर झाल्याचे चोरट्याने तिला सांगितले. गृहकर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक लाख ८८ हजार रुपये जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी फसवणूक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of 13 lakhs with a woman by showing fear of action pune print news rbk 25 ssb