लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची सायबर चोरट्यांनी १५ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी नारायण पेठेतील एका वसतीगृहात राहायला असून, ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. सायबर चोरट्यांनी तिच्या मोबाइल क्रमाकांवर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतात. समाजमाध्यमातील जाहिरात, तसेच चित्रफितीस दर्शक पसंती मिळवून दिल्यास परतावा मिळेल. घरातून काम करण्याची संधी, असे आमिष चोरट्यांनी तरुणीला दाखविले होते.
आणखी वाचा- तब्बल २८ वर्षांनी अभ्यासक्रमात बदल, नवा अभ्यासक्रम पुढील वर्षीपासून लागू
सुरुवातीला तरुणीला सायबर चोरट्यांनी एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने तरुणीने काम केले. तिला चोरट्यांनी पैसे दिले. पैसे मिळाल्यानंतर तरुणीचा विश्वास बसला. तरुणीला जाळ्यात ओढून ऑनलाइन कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. तरुणीने वेळोवेळी नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून पैसे घेऊन सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केली. तिने एकूण मिळून १५ लाख ४७ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर चोरट्यांनी संबंधित गुन्हा विश्रामबाग पोलिसांकडे तपासासाठी सोपविला. पोलीस निरीक्षक घोडके तपास करत आहेत.