लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : काळ्या पैसा व्यवहारात दिल्ली पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची २३ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर २१ सप्टेंबर रोजी संपर्क साधला हाेता. तुमच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँक खात्याचा काळा पैसा व्यवहारात वापर झाला असून, या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती चोरट्यांनी तरुणाला दाखविली. त्यानंतर तरुणाला बँक खात्यात तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. त्याननंतर तरुणाने चोरट्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. २३ लाख ५५ हजार रुपये जमा केल्यानंतर तरुणाच्या मोबाइलवर चोरट्यांनी पुन्हा संपर्क साधला. त्याला आणखी रक्कम जमा करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.

आणखी वाचा-शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार? 

गुंतवणुकीच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तक्रारदार हडपसर भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी १८ जून रोजी संपर्क साधला होता. एसबीआय सिक्युरिटीज कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर वेळोवेळी १४ लाख ३० हजार रुपये घेतले. बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.