शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातील मेट्रो प्रकल्पाजवळील जागेत गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची एक कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी ईश्वर चंदुलाल परमार (वय ७०) आणि सनत ईश्वर परमार (वय ४६) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकज गुल जगासिया (वय ४३) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर परिसरातील कामगार पुतळा परिसरातील एका जागेत मेट्रो प्रकल्प होणार आहे. या जागेत प्रकल्प होणार असून गुंतवणूक करण्याचे आमिष परमार यांनी जगसिया यांना दाखविले होते. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे: महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; घोरपडे पेठेतील घटना

संबंधित जागेत गुंतवणुकीच्या आमिषाने परमार यांनी जगासिया यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने तसेच धनादेशाद्वारे जगसिया यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. ही रक्कम एका खासगी बँकेतील ईश्वर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या खात्यात जमा करुन घेण्यात आली. ऑक्टोबर २०१६ पासून या जागेवर कोणतेही बांधकाम करण्यात आले नाही. संबंधित जागेवर परमार यांना विकसनााचे अधिकार नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगासिया यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of a businessman with the lure of investment in a plot near a metro project pune print news rbk 25 amy