लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने नफा मिळवून देण्याचे प्रकार वाढीस लागले असून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला ९६ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक बावधन परिसरात राहायला आहेत. त्यांना समाजमाध्यमातून एक संदेश पाठविण्यात आला होता. ऑनलाइन कामात भरपूर पैसे कमाविण्याची संधी आहे ,असे आमिष दाखविण्यात आले होते. व्यावसायिकाने संमती दिल्यानंतर सुरुवातीला त्यांना ऑनलाइन काम देण्यात आले. या कामाचे त्यांना दहा हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना दहा हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. व्यावसायिकाने ६८ हजार रुपये जमा केल्यानंतर त्यांना १२ हजार रुपये देण्यात आले.
हेही वाचा… पुणे: वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा
सायबर चोरट्यांनी त्यांना पैसे दिल्यानंतर व्यावसायिक जाळ्यात अडकवले. चोरट्यांनी त्यांना आमिष दाखवून त्यांना ऑनलाइन टास्क पूर्ण करण्यास सांगितले. व्यावसायिकाने ३५ लाख रुपये जमा केले. तेव्हा चोरट्यांनी ६१ लाखांचे पाच ऑनलाइन टास्क पूर्ण करा, असे चोरट्यांनी सांगितले. व्यावसायिकाने पैसे जमा केल्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन व्यावसायिकाने तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत.