पुणे: गुऱ्हाळासाठी घेतलेल्या उसाचे पैसे न देता शेतकऱ्यांची नऊ लाख ८० हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भगवान काळे (वय ५५, रा. वाळकी, ता. दौंड, जि. पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश परशुराम कोतवाल (वय ५५, रा. अष्टापूर, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळे शेतकऱ्यांकडून उस खरेदी करुन पुणे शहरातील रसवंतीगृह चालकांना उसाचा पुरवठा करतात. काळे यांनी तीन वर्षांपूर्वी कोतवाल यांच्यासह पाच शेतकऱ्यांकडून उस खरेदी केला होता. त्यानंतर कोतवाल यांच्यासह पाच शेतकऱ्यांचे पैसे काळे यांनी थकविले.
कोतवाल यांनी पैशांबाबत विचारणा केली. तेव्हा काळे यांनी पैसे देण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. गेले दोन वर्षे कोतवाल यांच्यासह पाच शेतकरी काळे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. काळे यांनी नऊ लाख ८० हजार रुपये परत देण्यास टाळाटाळ केल्याने कोतवाल यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार तपास करत आहेत.