पुणे महापालिकेत मुलांना नोकरी लावण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सज्जन गरुड, नितीन चव्हाण, संतोष तौवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त आहेत. आरोपी गरुड, चव्हाण येरवडा भागात राहायला आहेत. ज्येष्ठ नागरिकाची आरोपींशी ओळख होती. गरुड, चव्हाण तसेच त्यांचा साथीदार तौवर यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या दोन मुलांना महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाकडून पावणेसहा लाख रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतर मुलांना नोकरी लावून दिली नाही. ज्येष्ठ नागरिकाने विचारणा केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शेवाळे तपास करत आहेत.