पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये डेंटिस्ट असलेल्या डॉक्टरला मंत्रालयातील एका कक्ष अधिकाऱ्याने संचालकपदी निवडण्याच्या बहाण्याने तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा घातलाय. इतर साथीदारांच्या मदतीने तब्बल या अधिकाऱ्याने या दातांच्या डॉक्टरकडून १ कोटी ६ लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डॉ. आदित्य दगडू पतकराव (वय-३६) यांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
डॉ. आदित्य यांना सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संचालकपदी निवडण्याचं आमिष दाखवण्यात आलं आणि त्यातूनच फसवणूक केली. या प्रकरणी विकास शिंदे, राजाराम शिर्के (कक्ष अधिकारी मंत्रालय, मुंबई), श्रेया चौहान, अजित दुबे अशा ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आदित्य दगडू पतकरराव हे डेंटिस्ट आहेत. त्यांचं सांगवी परिसरात रुग्णालय आहे. डॉ. आदित्य यांची काही वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीमार्फत आरोपी राजाराम शिर्के याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर शिर्के यांनी डॉक्टरांशी फेसबुक इतर सोशल मीडियावर ओळख वाढवली. आरोपी शिर्के आणि डॉ. आदित्य यांच्यात अनेकदा फोनवरून संभाषण झाले. याशिवाय प्रत्यक्षात देखील अनेक वेळा भेट झाली.
भारत सरकारच्या राजमुद्रेचा गैरवापर
यानंतर राजाराम शिर्के यांनी डॉ. पतकराव यांना सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याचं संचालकपद तुम्हाला देऊ असं आमिष दाखवलं. मात्र, त्यासाठी पैसे द्यावे लागतील अशी अट घातली. डॉ. आदित्य यांनी होकार देत त्यांना तब्बल १ कोटी ६ लाख रुपये दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपींवर भारत सरकारची मुद्रा चुकीच्या आणि बनावट पद्धतीने वापरल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.