लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सायबर चोरट्यानी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) एका डॉक्टरची एक कोटी २२ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका ३२ वर्षीय डॉक्टरने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. शेअर बाजारातील गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशास डॉक्टरांनी प्रतिसाद दिला. चोरट्यांनी त्यांना एका समुहात सहभागी करून घेतले, तसेच त्यांना शेअर बाजाराबाबतची माहिती देणारे उपयोजन (ॲप) मोबाइलमध्ये घेण्यास सांगितले. जास्त गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले.

आणखी वाचा-ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन

त्यानंतर त्यांनी वेळोवेळी चोरट्यांनी दिलेल्या खात्यात पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना दहा कोटी २६ लाख रुपयांचा नफा मिळाल्याचे भासविले. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे मिळाले नाहीत. पैसे काढायचे असल्यास झालेल्या नफ्यावर पाच टक्के म्हणजेच ४६ लाख ४५ हजार ८५६ रुपये भरावे लागतील, तोपर्यंत नफ्यापोटी मिळालेली रक्कम गोठविण्यात येणार आहे, असे चोरट्यांनी सांगितले. त्यांनी पैशांची मागणी केली. तेव्हा चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत.

सायबर चोरट्यांच्या जाळ्यात उच्चशिक्षित

शहरात वर्षभरापासून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांच्या जाळ्यात उच्चशिक्षित सापडल्याचे निरीक्षण पोलिसांनी व्यक्त केले आहे. सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.