पुणे : सायबर चोरट्यांकडून वापरण्यात येणाऱ्या नवनवीन क्लुप्त्यांनी फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून केवळ एका दिवसात चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ३५ लाख ३ हजार १७७ रुपयांचा गंडा घातला आहे. नऊ जणांची फसवणूक झाली असून, यामध्ये चोरट्यांनी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन भरघोस नफा मिळवून देतो, ऑनलाईन टास्क जॉब देण्याचा बहाणा आणि इन्शुरन्स फंड जमा करण्याच्या तसेच टास्कच्या बहाण्याने ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी, चंदननगर, हडपसर, सहकारनगर तसेच संबंधित पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

शहरातील गुन्ह्यांचा आणि सायबर गुन्ह्यांचा आलेख एकसारखाच वाढत चालला असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून पाहावयास  मिळत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील ३४ पैकी आठ पोलीस ठाण्यांत बुधवारी एकाच दिवशी ३ कोटी ३५ लाख ३ हजार १७७ रुपयांच्या फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, हे गुन्हे नोंदवले जात असले तरी त्याचा तपास मात्र, रेंगाळतच सुरू आहे. कुशल मनुष्यबळासोबतच तांत्रिक यंत्रणेच्या अभावामुळे पोलिसांना या गुन्ह्यांचा तपास करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दुसरीकडे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीचा अभाव दिसत आहे.

हेही वाचा – पिंपरी : लग्नाच्या आमिषाने डॉक्टर मित्राने केलेल्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

हेही वाचा – लोणावळा : खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; २३ जण जखमी, द्रुतगती महामार्गावर दुर्घटना

इंडिया फायनान्स अ‍ॅथोरिटीकडून बोलत असल्याचे सांगून इंन्शुरन्स फंड जमा करण्याच्या बहाण्याने ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला २३ लाख ५३ हजार रुपयांना फसविले आहे. तर दुसऱ्या घटनेत शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाला ३४ लाख ६९ हजार रुपयांना गंडा घातला आहे. तसेच, तिसऱ्या फसवणुकीत शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातला आहे.