लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : तुमचे कुरिअर आले असून त्यासाठी दहा रुपये ‘गुगल पे’वर पाठवा, असे सांगत सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखाची फसवणूक केल्याची घटना दापोडी येथे घडली. प्रा. जयंत हरीभाऊ सावरकर (वय ५८, रा. सीएमई, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजमल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सावरकर हे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शर्मा नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी केला. तुम्हाला तुमचे कुरियर हवे असेल तर श्री. ट्रॅक कोन कुरीयर दिल्ली या कंपनीला ‘गुगल पे’ वरुन दहा रुपये पाठविण्यास सांगितले. ’गुगल पे’ ओपन केल्यानंतर मोबाइलचे सुरुवातीचे पाच अंक टाईप करा’ असे सांगितले. त्यावर सावरकर यांनी मोबाईलचे सुरुवातीचे पाच अंक टाईप केले. त्यानंतर शर्मा याने, मी आता माझ्या कुरियर वाल्यांना सांगतो की, तुमचे कुरियर पाठविण्याची प्रक्रिया करा. त्यानंतर सावरकर यांना एक दूरध्वनी आला की तुमच्या सोबत काहीतरी फसवणूक होत आहे.
आणखी वाचा-पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
ते त्यांच्या दापोडी सीएमई येथील एसबीआय बँकेच्या शाखेत गेले. त्यांनी विचारपूस केली असता त्यांच्या खात्यातून हतीनापूर बारपेटा (आसाम) येथील कॅनरा बँकमध्ये अजमल खान नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ९१ हजार ४६९ तसेच धामारायका राय (तामिळनाडू) येथील कॅनरा बँकेमध्ये अजमल खान नावाच्याच व्यक्तीच्या खात्यावर ८ हजार ४९९ रुपये असे एकूण ९९ हजार ९६८ ट्रान्सफर करून सावरकर यांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे तपास करीत आहेत.