व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने व्यावसायिकाची तीन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी कपील जगमोहन धिंग्रा (वय ४०, रा. प्रिस्टीन प्रोफाइल, वाकड) आणि गौरी कपील धिंग्रा (रा. कुमार प्राईड, मुकुंदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजेश रामचंद्र मेहता (वय ५५, रा. कुमार प्राईड, मुकुंदनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धिंग्रा यांनी मेहता यांना जुन्या मोटार खरेदी विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. मेहता यांना व्यवसायात ५० टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मेहता यांनी धिंग्रा यांना दोन कोटी रुपये दिले होते.

पैसे दिल्यानंतर धिंग्रा यांनी मेहता यांनी परतावा दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा आरोपींनी ८० लाख रुपयांची सदनिका मेहता यांच्या नावावर करुन देण्याचे आमिष दाखविले होते. मेहता यांच्या नावावर सदनिका हस्तांतरित करण्यात येणार असल्याची कागदपत्रे धिंग्रा यांनी मेहता यांना दिली. त्यानंतर त्यांनी सदनिकेची परस्पर दुसऱ्या एका व्यक्तीला विक्री केली. मेहता यांनी पैसे मागितले. तेव्हा टप्याटप्याने पैसे देतो, असे सांगण्यात आले. व्यवसायात नुकसान झाल्याची बतावणी त्यांनी मेहता यांच्याकडे केली. पैसे परत न केल्याने मेहता यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर तपास करत आहेत.