पुणे : तुपाच्या उत्पादनाची डीलरशीप देण्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल ३८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुबोध विश्वनाथ शिरोडकर (५५, रा. कर्वेनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत रमेश रघुनाथ भुजबळ (६१, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली असून मे २०२४ ते ५ मार्च २०२५ दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुजबळ हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांची आणि आरोपीची एका तीर्थक्षेत्रावर भेट झाली होती. फिर्यादीला तुपाच्या उत्पादनाची डीलरशीप देतो, असे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्याच कारणासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ३८ लाख ९७ हजार रुपये घेतले. सुरुवातीला काही दिवस फिर्यादींनी दिलेल्या रकमेवर नफा म्हणून काही पैसे दिले. मात्र, मुद्दल दिली नाही. आजपर्यंत एकूण ३८ लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अभिजित काळे पुढील तपास करीत आहेत.