पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
खराडी भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले. तरुणाला गुंतवणूक योजनांबाबतची माहिती दिली. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरले. पैसे भरल्यानंतर सुरुवातीला त्याला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत.
हडपसर भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी आठ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने तपास करत आहेत.
क्रेडीट कार्ड अद्ययावत करण्याची बतावणी
क्रेडीट कार्ड वापरकर्त्यांची माहिती अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका तरुणाची तीन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण वाघोली भागात राहायल आहे. तो एका खासगी बँकेचे क्रेडीट कार्ड वापरतो. चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. बँकेकडून क्रेडीट कार्ड वापरकर्त्यांची माहिती संकलित करुन अद्ययावत करण्यात येत आहे, अशी बतावणी चोरट्यांनी तरुणाकडे केली. तरुणाकडून बँक खात्याची गोपनीय माहिती, तसेच क्रेडीट कार्ड वापरचा सांकेतिक शब्द चोरट्यांनी घेतला. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी तरुणाच्या खात्यातून तीन लाख ८० हजार रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. वरिष्ठ पोलास निरीक्षक पंडीत रेजीतवाड तपास करत आहेत.