पुणे : काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणात अटक करण्याची धमकी देऊन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. एका ६९ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी धमकावून तिची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील औंध रस्ता भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी धमकी देऊन चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. गेल्या दीड महिन्यात चोरट्यांनी महिलेला धमकावून वेळोवेळी पैसे घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून डिजिटल ॲरेस्टची धमकी देऊन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तरुणीची साडेदहा लाखांची फसवणूक
डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून भारती विद्यापीठ भागातील एका तरुणीची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधून तिच्याकडे बतावणी केली. काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून तिच्याकडून चोरट्यांनी पैसे उकळले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.