भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनीषा बाबू मारणे (वय ३५, रा. हनुमाननगर, केळेवाडी, कोथरुड) असे गु्न्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनीषा मारणेने दरमहा फंडात गुंतवणुकीचे आमिष हनुमाननगर भागातील कष्टकरी महिलांना दाखविले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्यात येईल, असे आमिष तिने दाखविले होते. तक्रारदार महिलेकडून मारणेने दोन लाख ६२ हजार ६०० रुपये गुंतवणुकीस घेतले होते.

तक्रारदार महिलेला पैशांची गरज असल्याने तिने मारणेकडे पैसे परत मागितले. मारणेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. थोडे दिवस थांबा, पैसे बुडवणार नाही, असे तिने सांगितले. त्यानंतर महिलेने पुन्हा पैसे मागितले. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने मारणेच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मारणेच्या विरोधात आतापर्यंत आठ महिलांनी तक्रारी दाखल केल्या असून पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.