पुणे : ऑनलाइन औषध खरेदी प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या चोरट्यास चंदननगर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. समीर नरेश रॉय (वय २१, रा. बज्रपुकुर, दिनाजपूर, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत खराडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती.
ज्येष्ठ नागरिकाने जानेवारी महिन्यात औषधे ऑनलाइन पद्धतीने मागवली होती. औषधांचे कुरियर कुठपर्यंत आले आहे, याबाबतची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित कंपनीचा संपर्क क्रमांक मिळवला होता. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता सायबर चोरट्याने माहिती देण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवली. ज्येष्ठ नागरिकाने लिंक उघडताच बँक खात्यातून एक लाख २३ हजार ९९९ रुपये परस्पर वळवण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
हेही वाचा – पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाने पाठवले ‘हे’ पत्र
या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. तेव्हा बँक खातेधारक पश्चिम बंगालमधील असल्याचे उघडकीस आले. बँक खात्याशी जोडलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेलची तांत्रिक पडताळणी पोलिसांनी केली. तेव्हा तांत्रिक तपासात आरोपी राॅय दिनाजपूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले आणि पथकाने त्याला दिनाजपूर परिसरातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.