फेसबुकवर झालेल्या ओळखीतून अमेरिकेत गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला ४७ लाखांचा गंडा घालणाऱ्या नायजेरियन चोरटय़ाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी उसेन जोशुभा ओगागा ओघेन (वय २६, सध्या रा. नोएडा, मूळ  रा. नायजेरिया) याला अटक करण्यात आली आहे. उसेन नोएडातील एका शिक्षण संस्थेत माहिती-तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रम करत आहे. त्याने एका महिलेच्या नावाने फेसबुकवर खाते उघडले होते. काही महिन्यांपूर्वी त्याने पुण्यातील शंकरशेठ रस्ता भागातील रहिवासी बांधकाम व्यावसायिक हरनिश हिंमतलाल शहानपुरिया (वय ५९) यांना मैत्रीची विनंती पाठविली होती. उसेन याने महिलेच्या नावाने उघडलेल्या फेसबुक खात्याच्या माध्यमातून हरनिश यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. अमेरिकेत जमीन खरेदी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष त्यांना दाखविले होते.त्यानंतर त्याने ६ जून रोजी भारतात येणार असल्याची बतावणी केली होती.

दरम्यान, दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पकडल्याची बतावणी उसेनने केली. उसेनच्या साथीदार महिलेने हरनिश यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून बतावणी केली होती. त्यांना तातडीने एका बँक खात्यात पैसे भरण्याची सूचना केली होती. त्यानंतर वेळोवेळी हरनिश यांच्याकडून ४७ लाख ७ हजार ८०० रुपये उकळण्यात आले होते. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्य़ाचा सायबर गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात उसेन उत्तर प्रदेशातील नोएडा भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांच्या सूचनेनंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले.

सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, उपनिरीक्षक किरण औटी, अलका जाधव, सरिता वेताळ, बाबासाहेब कराळे, नीतेश शेलार, शिरीष गावडे, संतोष जाधव, ज्योती दिवाणे यांनी उसेन याला दिल्लीतून ताब्यात घेतले. त्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud with building businessman from facebook
Show comments