लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तन्मय रमेश जाधव (रा. औदुंबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांची एका परिचितामार्फत आरोपी तन्मय जाधवशी ओळख झाली होती. तक्रारदाराला व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. जाधवने व्यंकटेश्वरा एंटरप्रायजेस या खासगी वित्तीय संस्थेकडून १५ दिवसात चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर तक्रारदारांना त्याने रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले.

आणखी वाचा-पुणे : बालेवाडीत दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू

तेथे त्यांच्याबरोबर मुद्रांकावर करारनामा केला. कर्ज मंजुरीसाठी त्यांच्याकडून वेळोवेळी सहा लाख ८७ हजार रुपये जाधवने घेतले. मात्र, त्यांना कर्ज दिले नाही. याबाबत व्यावसायिकाने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जे. आर. फडतरे तपास करत आहेत.

Story img Loader