लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : रुग्णालयातील छतावर सौर उर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने एका डॉक्टरांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रदीप बबन जामदार (रा. बेंडा बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका डॉक्टरांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-शिक्षकांना टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ… काय आहे निर्णय?

तक्रारदारांचे मंगळवार पेठेतील पारगे चौकात रुग्णालय आहे. तक्रारदार डॉक्टरांच्या रुग्णालयातील छतावर सौर उर्जा यंत्रणा बसविण्यात येणार होती. आरोपी जामदारने सौर उर्जा यंत्रणा बसवून देण्यासाठी साडेसात लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्याला सुरुवातीला ४८ हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात सात लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर जामदारने काम अर्धवट सोडून दिले. सौर उर्जा यंत्रणा बसवून न देता तो पसार झाला. डॉक्टरांनी त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.