जमिनी खरेदीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने पुणे व परिसरातील ३० जणांची सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईला पसार झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे.
हेही वाचा >>>पुणे : जी-२० बैठकीसाठी साठ चौकांचे सुशोभीकरण ; महापालिका घेणार बांधकाम व्यावसायिक, संस्थांची मदत
के. आर. मलिक आणि शाहरूख मलिक हे पिता-पुत्र या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला, त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी के. आर. मलिक हे मूळचे केरळमधील आहेत. दुबई, सिंगापूर, बहरिन, मस्कत येथे त्यांनी आलिशान कार्यालये थाटली आहेत. तेथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेऊन आरोपींनी तेथील भारतीयांना भुरळ घातली. हिंजवडी, माण, मारूंजी, कासारसाई, जांबे या ठिकाणी जमीन खरेदी केल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल, असे सांगत त्यांनी जमीन खरेदीसाठी अनेकांकडून पैसे जमा केले. त्यात आपली फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले.
हेही वाचा >>>पुणे : धानोरीतील वाहतूक कोंडी फुटणार; पर्यायी रस्त्यासाठी जागा देण्यास खासगी शाळेची सहमती
हिंजवडीतील एकाच प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या ५८२ जणांची सुमारे ६१ कोटींची फसवणूक झाली आहे. यातील काही नागरिकांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता पुणे व परिसरातील ३० प्रकरणांमध्ये अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत २०० कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा >>>उपाहारगृह भाडेतत्वावर देण्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक
मलिक पिता-पुत्रांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत जवळपास ५८२ जणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी हिंजवडीत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपी सध्या परदेशात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. आरोपींनी दुबई, सिंगापूर येथे कार्यालय थाटले होते. तेथील भारतीयांची त्यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत.- काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त