पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची २९ लाख ५० हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विशालभाई गोविंदभाई रावल (वय २६) , मयूरभाई चौधरी, गोपालभाई रावल (तिघे रा. गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांची एका परिचितामार्फत आरोपी रावल, चौधरी यांच्याशी ओळख झाली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी तक्रारदाराला दाखविले होते.
आरोपी तक्रारदाराला कोथरुड भागात भेटले होते. त्यांच्याकडून वेळोवेळी २९ लाख ५० हजार रुपये घेतले. आरोपींना पैसे दिल्यानंतर तक्रारदाराला परतावा देण्यात आला नाही. पैशांबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सावळे तपास करत आहेत.