परदेशातील एका तारांकित हॉटेलमध्ये नोकरीच्या आमिषाने हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी मुंबईतून अटक केली. आरोपींनी समाजमाध्यमावर जाहीरात प्रसारित करुन विद्यार्थ्यांची फसवणूक केली. आरोपींकडून फस‌वणुकीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.राधेशाम मंगळू महाराणा (वय ४६, रा. गोरेगाव, मुंबई), जितेश विलास जाधव (वय ४०, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निशांत जाधव (वय २२, रा. चिंचवड) याने स्वारगेट फिर्याद दिली आहे.

आरोपींनी ‘सक्सेस करिअर’ कन्सलटन्सीकडून परदेशातील तारांकित हॉटेलमध्ये नोकरीच्या अमिष दाखविणारी जाहीरात प्रसारित केली होती. जाधव, त्याचे मित्र वेदांत शिंदे, दानिश मोैलवी, शिवम दुबे यांनी आरोपी महाराणा आणि जाधव यांच्याशी संपर्क साधला. नोकरीच्या आमिषाने आरोपींनी चौघांकडून साडेचार लाख रुपये घेतले.

हेही वाचा : पुणे : जागतिक टपाल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

मात्र, त्यांना नोकरी मिळवून दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाधवने पोलिसांकडे तक्रार दिली होती. गुन्ह्याचा तपासात पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले यांना आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोसले, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, धीरज पवार, संदीप घुले, मंगेश बोऱ्हाडे आदींनी आरोपी महाराणा आणि जाधव यांना मुंबईतून ताब्यात घेतले.

Story img Loader