पुणे: वीज मीटर बसवण्याची बतावणी करुन रिक्षाचालकाची फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एन.ओंडरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत रज्जाक इसाक सय्यद यांनी ॲड. अफरोज एच. शेख यांच्यामार्फत न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने नितीन रमेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले. सय्यद यांना इमारतीमध्ये वीज मीटर बसवायचा होता. इलेक्टिक काम करणाऱ्या कामगाराच्या माध्यमातून सय्यद आणि नाईक यांची ओळख झाली होती. मी महावितरणचा ठेकेदार आहे. १५ दिवस मीटर बसवून देतो, असे आमिष नाईक यांनी सय्यद यांना दाखविले होते.
हेही वाचा >>> पुणे : राज्यातील पाच पाेलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा
त्यानुसार सय्यद यांनी नाईक यांना एक मार्च रोजी ४६ हजार रुपये दिले होते. नाईक यांनी वीज मीटर बसविले नाही. सय्यद यांनी विचारणा केली. तेव्हा नाईक यांनी पैसे परत करण्यास नकार दिला. तुमचे काम होणार नाही; तसेच पैसेही परत करणार नाही, असे त्यांनी सय्यद यांना सांगितले. सय्यद यांनी चौकशी केली. तेव्हा नाईक महावितरणाचे ठेकेदार नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सय्यद यांनी त्यांचे वकील ॲड. शेख यांच्यामार्फत न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली.