पुणे : स्वस्तात सोने देण्याची बतावणी करणाऱ्या चोरट्यांनी एका महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. महिलेने बँकेत मुदतठेव स्वरुपात ठेवलेले पाच लाख रुपये चोरट्यांना दिले. त्या बदल्यात चोरट्यांनी महिलेला सोन्यासारखे दिसणारे पिवळ्या रंगाचे बनावट धातुचे मणी दिल्याचे उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत एका ४६ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. गंज पेठेतील मासे आळी परिसरात महिला आणि तिचे पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. आठवड्यापूर्वी महिलेच्या पतीला या भागात चोरटे भेटले आणि स्वस्तात चांदीची नाणी देण्याची बतावणी केली होती. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक महिलेच्या पतीला दिले. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा महिलेच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

आम्हाला गुप्तधन सापडले असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. स्वस्तात सोने देण्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले. महिलेला चोरट्यांनी स्वारगेट परिसरात बोलावून घेतले. तेथे त्यांना एक मणी दिला. सराफाकडे जाऊन खात्री पटवा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. महिलेने सराफाकडे जाऊन तपासणी केली. तेव्हा मणी सोन्याचा असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिला आणि तिच्या पतीचा विश्वास बसला. त्यानंतर चोरटे पुन्हा त्यांना भेटले. स्वस्तात सोन्याचे मणी देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे चोरट्यांनी सांगितले.

महिला आणि तिच्या पतीने बँकेतून मुदतठेव स्वरुपात ठेवलेले पाच लाख रुपये काढले. चोरट्यांनी महिला आणि तिच्या पतीला स्वारगेट भागात बोलावले. चोरट्यांनी त्यांना पिशवी दिली. पिशवीत सोन्याचे मणी असून घरी जाऊन उघडा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. चोरट्यांना पाच लाख रुपये देऊन महिला आणि पती घरी आले. त्यांनी सराफाकडे जाऊन मणी दाखविले. तेव्हा ते बनावट असल्याचे आढळून आले.

हेही वाचा : ठाणे: पोलीस असल्याचं भासवून महिलेला घातला गंडा, चौघांनी भरदिवसा लुटले १ लाखाचे दागिने

पीडित महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करत आहेत.