मराठी विभागाकडून आदिवासी गावांतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके रवाना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. या विद्यार्थ्यांनी आदिवासी पाडय़ांवरील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालसाहित्याची पुस्तके जमवली. मासिके, पुस्तके, दिवाळी अंक अशी अक्षर फराळाची भेट नुकतीच रवाना करण्यात आली.

राज्याच्या ग्रामीण भागात अद्यापही पुस्तके पुरेशा पद्धतीने पोहोचत नाहीत. शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांपलीकडे अवांतर वाचनाच्या पुस्तकांपासून विद्यार्थी वंचित राहतात. त्यामुळे त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण होत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन विद्यापीठातील मराठी विभागाच्या राहुल खंडागळे या विद्यार्थ्यांने दिवाळी निमित्ताने आदिवासी पाडय़ातील विद्यार्थ्यांना अक्षर फराळ भेट देण्याचा विचार मांडला. त्याला अन्य विद्यार्थी आणि विभागाकडूनही प्रतिसाद मिळाला. त्यातून जवळपास तीनशे पुस्तके जमवण्यात आली.

‘आम्ही ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहोत. पुण्यात आल्यावर आम्हाला पुस्तके मिळू लागली. वाचनाची गोडी निर्माण झाली, महत्त्व कळले. मात्र, आजही ग्रामीण भागातील विद्यार्थी पुस्तकांपासून दुरावलेले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने अनेक लोक आदिवासी पाडय़ांवर जाऊन फराळ, अन्य साहित्य देतात. तसे न करता आम्ही पुस्तके भेट देण्याचे ठरवले. या कल्पनेसाठी काही विद्यार्थी

मित्रांनी पुस्तके दिली, तर काहींनी रक्कम दिली. विभागाकडूनही किशोरचे अंक, काही पुस्तके, मासिके देण्यात आली. तसेच काही पुस्तके विकत घेण्यात आली. पहिल्याच प्रयत्नाला चांगले यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आहे. आदिवासी पाडय़ांवर ओपन लायब्ररी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,’ असे विभागातील विद्यार्थी अक्षय लावंड याने सांगितले.

विद्यार्थ्यांनी आदिवासी पाडय़ांतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देण्याची कल्पना मांडली. अत्यंत स्तुत्य असा हा विचार होता. त्यामुळे विभागाच्या माध्यमातूनच हा उपक्रम राबवण्याचे ठरले. पहिल्याच प्रयत्नात दोन जिल्ह्य़ांसाठी तीनशे पुस्तके देण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर राबवलेला हा उपक्रम यशस्वी ठरला. पुढील काळात आणखी काही जिल्ह्य़ांमध्येही हा उपक्रम नेण्यात येईल.    – प्रा. डॉ. तुकाराम रोंगडे, मराठी विभाग प्रमुख

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free book distribution in pune
Show comments