महापालिका तसेच अन्य शाळांमध्ये शिकणाऱ्या पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना यंदाही पीएमपीचे पास दिले जाणार असून या योजनेला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. चालू शैक्षणिक वर्षांसाठी हे पास दिले जाणार आहेत. त्यासाठी तूर्त दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दिली जात असलेली आकडेवारी मोघम असून प्रत्यक्ष आकडेवारी पुढच्या बैठकीत सादर करा, असा आदेश या वेळी देण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत जाण्यासाठी पीएमपी सेवा आवश्यक असते अशा विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे पास दिले जातात. अशाचप्रकारे खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही महापालिका पीएमपीचे मोफत पास देते. गेल्या वर्षी या योजनेत ४७ हजार विद्यार्थ्यांना पास देण्यात आले होते. यंदा या पास वितरणासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद तूर्त करण्यात आली असून ही रक्कम पीएमपीला देण्याचा विषय स्थायी समितीत एकमताने मंजूर करण्यात आल्याचे कर्णे गुरुजी यांनी सांगितले. पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ही पासची सवलत दिली जाते.
आकडेवारी नाही, तरीही रक्कम मंजूर
ही रक्कम मंजूर करण्याचा विषय आल्यानंतर पृथ्वीराज सुतार यांनी त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मुळात यंदा किती विद्यार्थ्यांना हे पास दिले जाणार आहेत याची कोणतीही माहिती नसताना परस्पर रक्कम का द्यायची आणि वर्षभरातील २२० दिवस शाळेचे असताना पीएमपी वर्षभराच्या पासची रक्कम पालिकेकडून का घेते, असे प्रश्न सुतार यांनी विचारले. मात्र, त्याबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती देता आली नाही. हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांनीही याच विषयाबाबत अनेक आक्षेप घेतले. या पासचा लाभ विद्यार्थ्यांना ऑगस्टपर्यंत मिळतच नाही. मात्र, पीएमपी जून महिन्यापासूनचे पैसे घेते, असेही सुतार यांनी निदर्शनास आणून दिले. त्याबाबतही खुलासा करण्यात आला नाही. विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष प्रवासाचे दिवस यांची नेमकी संख्या समजल्याशिवाय ही रक्कम कशी देता येईल, अशीही विचारणा करण्यात आली. मात्र कोणतीही माहिती दिली जात नसल्यामुळे अखेर पुढील बैठकीत सविस्तर आकडेवारी सादर करा, असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा