पिंपरी महापालिकेत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत पुरविण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब केले. जवळपास ३० कोटी रूपयांच्या विविध कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली.

विधी समिती, स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम आदी विभागप्रमुख उपस्थित होते.

विकासनगर, मामुर्डीतील ताब्यात आलेले रस्ते डांबरीकरण करून विकसित करण्यासाठी १० कोटी ६४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. रावेत येथील मुख्य जलवाहिनीची क्षमता वाढवण्याकरीता आवश्यक कामांसाठी ५ कोटी ४८ लाख रुपये मंजूर करण्यात आले. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत मलवाहिनी सुधारणा कामे करण्यासाठी ४३ लाख रुपये तसेच भाटनगर, बौद्धनगर, रमाबाई नगर झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक सुविधांसाठी १६ लाख ४८ हजार रुपये, उद्यान विभागाच्या साहित्य खरेदीसाठी ७२ लाख ४५ हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. तळवडे येथील जलउपसा केंद्राजवळच्या कामांसाठी महावितरण कंपनीस ६० लाख ७१ हजार रुपये अनामत रक्कम तसेच पर्यवेक्षण शुल्क देण्यास राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी अडीच कोटी रूपये

दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी पिंपरी पालिकेकडून अडीच कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पिंपरी पालिकेने अडीच कोटी रूपये द्यावेत, असे आदेश माजी पालकमंत्री अजित पवार यांनी २८ मे रोजी झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार, पिंपरी पालिकेने हा निधी देऊ केला आहे.

Story img Loader