पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक बहुमाध्यम केंद्र (ईएमएमआरसी) आणि शैक्षणिक संज्ञापन महासंघातर्फे (सीईसी) यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध ऑनलाईन श्रेयांक अभ्यासक्रमांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वयम् संकेतस्थळावर उपलब्ध असलेले हे सर्व अभ्यासक्रम विनामूल्य असून, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्वयम् मार्फत परीक्षा घेऊन संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि श्रेयांक गुण प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. फंडामेंटल ऑफ ऑफिस मॅनेजेंट अँड मेथड्स, इंडियन क्लासिकल डान्स – कथ्थक, मायक्रो इकॅानॉमिक्स, पर्सनॅलिटी डेव्हलमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलमेंट अँड कम्युनिकेशन स्किल या अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांना swayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी केल्यानंतर आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दृकश्राव्य व्याख्याने पाहता येतील. तसेच त्या संदर्भातील इतर अभ्यास साहित्यही ऑनलाइन उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना दर आठवड्याला गृहपाठ आणि प्रश्नांची उत्तरे सादर करावी लागतील. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे पदवीच्या विद्यार्थ्यांनी मुदतीमध्ये अभ्यासक्रमाला नोंदणी करण्याबाबत विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.