महापालिका हद्दीबाहेरून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही सवलतीच्या दरात पास देण्यास नकार देणाऱ्या पीएमपीकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर मात्र फुकट पासची खैरात केली जात असल्याचे प्रकरण माहिती अधिकारामुळे उघडकीस आले आहे. पीएमपीकडून दरवर्षी लाखो रुपयांचे मोफत पास आरटीओ कर्मचाऱ्यांना सप्रेम भेट देण्यात येत आहेत. पीएमपीकडून आरटीओला मोफत पास कशासाठी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
आर्थिक संकटामुळे चर्चेत असलेल्या पीएमपीची उधळपट्टी सातत्याने उजेडात येत असून मोफत पासचे हे प्रकरणही अशाच प्रकारातील आहे. महाराष्ट्र कामगार मंचचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली होती. पीएमपीकडून गेल्या वर्षी पुणे व पिंपरी आरटीओ मधील १०२ कर्मचाऱ्यांना, तर या वर्षी ८६ कर्मचाऱ्यांना मोफत पास देण्यात आले. महापालिका हद्दीतील एका पासची वार्षिक किंमत १४ हजार ४०० रुपये असून हद्दीबाहेरील एका पासची वार्षिक किंमत १८ हजार रुपये इतकी आहे. पासचे हे मूल्य व वितरित केलेले पास विचारात घेता चालू वर्षी आरटीओला किमान साडेबारा लाख रुपयांचे पास दिल्याचे दिसत आहे आणि असाच प्रकार अनेक वर्षे सुरू असल्याचे मोहिते यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पीएमपीकडून आरटीओमधील कनिष्ठ लिपिक, शिपाई, वाहनचालक, सफाई कामगार आदी सर्वच कर्मचाऱ्यांना हे पास देण्यात आल्याचे माहिती अधिकारात सांगण्यात आले आहे. पीएमपीमधील कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार हे पास वितरित केले गेले, तसेच हे पास आरटीओमधील कर्मचाऱ्यांना का दिले जातात यासंबंधीचा खुलासा पीएमपीने करावा, अशी मागणी मोहिते यांनी केली आहे. विशेष म्हणजे, परिवहन कार्यालयातून आलेली सर्व पत्रे मोफत पास मिळण्यासंबंधी; अशाच विषयाची असून पीएमपीला एवढे पास का द्यावे लागतात, या दोन संस्थांमध्ये पास देण्याबाबत काय करार झाला आहे, याचा खुलासा व्हावा, अशीही मागणी मोहिते यांनी केली आहे.
हितसंबंधांवर प्रकाश टाकणारा प्रकार
‘ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन पास ४० वरून २० रुपये, तर मासिक पास ४५० वरून २५० रुपये करावा अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत; पण आर्थिक कारण सांगून पास सवलतीत देण्याऐवजी त्यांची किंमत सातत्याने वाढवली जात आहे. दुसरीकडे अशाप्रकारे लाखो रुपयांचे पास आरटीओ कर्मचाऱ्यांना वाटले जात आहेत. हा प्रकारच पुरेसा बोलका आणि दोन्ही संस्थांमधील हितसंबंधांवर प्रकाश टाकणारा आहे,’ अशी प्रतिक्रिया पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
पीएमपीच्या उधळपट्टीचे आणखी एक प्रकरण उजेडात
पीएमपीकडून दरवर्षी लाखो रुपयांचे मोफत पास आरटीओ कर्मचाऱ्यांना सप्रेम भेट देण्यात येत आहेत. पीएमपीकडून आरटीओला मोफत पास कशासाठी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
First published on: 12-07-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free passes to rto from pmp