पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त मोफत विशेष बससेवा देण्यात येणार आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारी चार वाजल्यापासून बुधवारी (१ जानेवारी) रात्री बारा वाजेपर्यंत बससेवा सुरू असणार आहे. त्यासाठी लोणीकंद विभाग आणि शिक्रापूर विभागातून विविध मार्गांवरून बस धावणार असून, अनुयायांना सुलभ प्रवास करता येणार आहे, अशी माहिती ‘पीएमपी’कडून शनिवारी देण्यात आली.
कोरेगाव भीमा येथे नववर्षारंभी विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यासाठी देशभरातून आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. अनुयायांची वाढती संख्या ध्यानात घेऊन इच्छितस्थळी जाण्यासाठी ‘पीएमपी’कडून दर वर्षी मोफत बससेवा देण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही सेवा देण्यात येत आहे.
हेही वाचा…वसतिगृहांमधील असुविधेबाबत थेट ठेकेदारांवर कारवाई होणार ?
लोणीकंद विभागामार्फत मंगळवारी दुपारी चार ते पहाटे चार वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचवन, फुलगाव शाळा आणि पेरणे गावापर्यंत ७५ मोफत बसचे नियोजन करण्यात आले आहे, तर बुधवारी पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत २५० बस याच मार्गांवरून धावणार आहेत.
शिक्रापूर विभागातून मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून शिक्रापूर रस्ता, जीत पार्किंग वक्फ बोर्ड, पिंपळे जगताप चाकण रस्ता ते कोरेगाव भीमा विजयस्तंभापर्यंत १४० बस मार्गावर असतील. त्याचबरोबर वढू पार्किंग इनामदार हाॅस्पिटल ते वढूपर्यंत दहा बसचा वेगळा मार्ग असणार आहे, तर बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ३५० बस याच मार्गावरून धावणार आहेत.
हेही वाचा…हंगामाच्या सुरुवातीला आंबेमोहोर महाग; किरकोळ बाजारात प्रतिकिलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढ
असे आहे बसचे नियोजन
स्थानकाचे नाव – जादा बसची संख्या
पुणे रेल्वे स्थानक मोलेदिना बसस्थानक – ३१
मनपा भवन बसस्थानक – ३३
दापोडी मंत्री निकेतन – ०२
ढोले पाटील रस्ता मनपा शाळा – ०२
अप्पर डेपो बसस्थानक – ०४
पिंपरी आंबेडकर चौक – ०३
एकूण – ७५