गरोदर स्त्रियांना स्वाईन फ्लूची मोफत लस देण्यासाठीच्या केंद्रांची संख्या शासनाने वाढवली असून आता पुण्यात ५ ठिकाणी, पिंपरी- चिंचवडमध्ये २ ठिकाणी आणि पुण्याच्या जिल्हा भागात तीन ठिकाणी ही लस मोफत मिळणार आहे. जुलैअखेर ही योजना सुरू करण्यात आली होती, मात्र आतापर्यंत पुण्यात केवळ औंधच्या जिल्हा रुग्णालयात लस मिळत असल्यामुळे त्याला असलेला प्रतिसाद अत्यल्प होता.
सोमवारपासून (१ सप्टेंबर) ही केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी दिली. या ठिकाणी गरोदरपणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत असलेल्या स्त्रियांना स्वाईन फ्लूची लस मोफत मिळू शकेल.
राज्याच्या साथरोग विभागाच्या तांत्रिक समितीने अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींना स्वाईन फ्लूची लस दिली जावी, अशी सूचना केली होती. साथरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे म्हणाले,‘२९ जुलैला राज्यात ६ केंद्रांवर गरोदर स्त्रियांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. त्यात पुण्यात केवळ औंध जिल्हा रुग्णालयात या लसी दिल्या जात होत्या. आता राज्यात अजून ५१ ठिकाणी गरोदर स्त्रियांसाठी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शासनाने ‘अ‍ॅबॉट’ या कंपनीच्या ‘इन्फ्लुव्हॅक’ या टोचून घेण्याच्या (इंजेक्टेबल) १ लाख लसींसाठी मागणी केली होती, त्यापैकी १० हजार लसी शासनाला प्राप्त झाल्या आहेत.’
गरोदर स्त्रिया हा विशेष संवेदनशील गट मानला जात असून गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यापासून पुढे या मातांनी इंजेक्टेबल स्वाईन फ्लू लस घेतल्यास मृत्यू टाळता येऊ शकतील असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले,‘लसीकरण केंद्रांवरील डॉक्टर व परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागतो, त्यामुळे गरोदर स्त्रियांनी त्वरित लस घेण्यास प्राधान्य द्यावे. ऑक्टोबरनंतर स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होऊ लागतो.’

गरोदर मातांना येथे  मोफत लस मिळेल –
पुणे-
* बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय (ससून)
* मालती कोचे रुग्णालय, गाडीखाना
* राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
* सोनवणे रुग्णालय, भवानी पेठ
* कमला नेहरू रुग्णालय
पिंपरी- चिंचवड-
* यशवंतराव चव्हाण रुग्णालय
* तालेरा रुग्णालय
पुणे-ग्रामीण-
* औंध जिल्हा रुग्णालय
* सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय (बारामती)
* मंचर उपजिल्हा रुग्णालय