पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अनेकदा सर्व्हर डाऊन असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. सर्व्हर डाऊन होणे एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं. कारण केस पेपरपासून अक्षरशः डॉक्टर औषधांची नोंद कॉम्प्युटरवर करण्यापर्यंत सगळे सर्व्हरवर अवलंबून आहे. केस पेपरची नोंद केल्यानंतरच डॉक्टर रुग्णाला तपासतात. बहुतांश सर्वच विभागातील सर्व्हर डाऊन असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी देखील या गोष्टीला कंटाळले आहेत. त्यांना रुग्णाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
पिंपरी- चिंचवड महानगर पालिका सर्वात श्रीमंत महानगर पालिका म्हणून एकेकाळी ओळखली जायची. शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी महानगर पालिकेने सुसज्ज असे यशवंतराव चव्हाण रुग्णालय उभारण्यात आले. पुणे जिह्यातून या रुग्णालयात हजारो रुग्ण दररोज येत असतात. असं असताना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अडचणींचा डोंगर असल्याचे बघायला मिळत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णालयात सर्व्हर डाऊन होत आहे. अर्धा-अर्धा तास सर्व्हर डाऊन असल्याने सर्वच सेवा ठप्प होते. केस पेपरपासून ते औषधे घेण्यापर्यंत सर्व विभागातील सर्व्हर डाऊन असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे, रुग्णांच्या रांगा लागत आहेत. दिवसातून अनेकदा या परिस्थितीला रुग्णांना तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या दीड- दोन महिन्यांपासून सर्व्हर डाऊन होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बघण्यास वेळ नाही. यामुळे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात वाद होण्याची शक्यता जास्त होते. अनेकदा झालेले देखील आहेत.
आणखी वाचा-पिंपरीतील दि-सेवा विकास सहकारी बँकेचा लेखा परीक्षण अहवाल रद्द; सहकार मंत्री अतुल सावे यांचे आदेश
रुग्णालय म्हटलं की स्वच्छता हवीच. पण यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. उग्र वास येतो, त्यामुळं अनेकदा नाकाला रुमाल किंवा हात लावून पुढे जाण्याची वेळ नागरिकांना येते. ५० नंबर विभागात चीफ मेडिकल ऑफिसर अनेकदा नसल्याने एमर्जन्सीला इंटर्न डॉक्टर्सवर रुग्णांवर लक्ष देण्याची वेळ येत आहे. हे सर्व बघता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नियम आहेत की नाही? असा प्रश्न पडतो. याच यशवंतराव चव्हाण रुग्णालयाने कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवून चांगली कामगिरी केलेली आहे. पुन्हा ते जोमाने काम करतील अशीच अपेक्षा सर्वसामान्य गरीब रुग्णांना आहे.
“आताची सर्व्हर सिस्टीम जुनी झालेली आहे. सकाळी ११ ते ०१ च्या दरम्यान रुग्ण जास्त असल्याने त्यावर लोड येऊन सर्व्हरवर ताण येतो. याचा नाहक त्रास रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना होतो आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण सर्व्हर सिस्टीम बदलत आहोत. गेली दहा वर्षे झालं तीच सिस्टीम असल्याने बदलण्याची वेळ आली.” -राजेंद्र वाबळे, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता