जिल्हा सहकारी उपनिबंधक व सहकारी विकास महामंडळ यांच्या समन्वयातून उपक्रम

शेतकऱ्यांची ताजी भाजी पिंपरी चिंचवडमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दारात थेट येणार आहे. जिल्हा सहकारी उपनिबंधक आणि महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ यांच्या समन्वयातून गृहनिर्माण संस्थांमध्ये शेतकऱ्यांच्या ताज्या भाजीपाल्याची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, वाकड येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये शेतकऱ्यांचा माल थेट विक्रीसाठी आणायला सुरुवात झाली आहे.

सहकार मंत्रालयाने नुकताच एक अध्यादेश काढला असून, उपनिबंधकाच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण फेडरेशनशी समन्वय साधून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्षांची बैठक घेण्याबाबत कळवण्यात आले आहे. या बैठकीत गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांबरोबर चर्चा करून ‘कॉप शॉप’ या योजनेची माहिती दिली जाणार आहे. यापूर्वी पणन महामंडळामार्फत शेतकऱ्यांची भाजी थेट गृहनिर्माण संस्थांच्या आवारात विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्याला फारसे यश आले नाही. त्यामुळे जिल्हा सहकारी उपनिबंधकांच्या माध्यमातून ‘कॉप शॉप’ ही योजना राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा, तसेच गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनाही ताजी भाजी योग्य दरात मिळावी असा या योजनेमागचा उद्देश आहे. या योजनेत शेतकरी गट, बचत गट किंवा शेतकरी त्यांचा पिकवलेला भाजीपाला थेट गृहनिर्माण संस्थांच्या आवारात विक्री करू शकतात.

जिल्हा सहकारी उपनिबंधक गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना ‘कॉप शॉप’ या योजनेचे महत्त्व पटवून देणार आहेत. जास्तीतजास्त गृहनिर्माण संस्थांमध्ये शेतकऱ्याचा माल विक्री करण्यासाठी परवानगी मिळावी असा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गृहनिर्माण संस्थेला त्यांच्या आवारात शेतकऱ्याला मोबाइल दुकान किंवा भाजीपाला विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात येईल.

उपनिबंधक कार्यालय क्रमांक तीनच्या अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली आहे. ‘को. ऑप. शॉप’ या योजनेची माहिती प्रतिनिधींना देण्यात आली असून, गृहनिर्माण संस्था मोठय़ा संख्येने या योजनेचा लाभ घेतील.

डॉ. शीतल पाटील, उपनिबंधक, कार्यालय पुणे क्रमांक ६, पिंपरी

Story img Loader