वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता तक्रारीतील तरुणाची हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पैशांच्या व्यवहारातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचं उघड झाले आहे. आरोपी मित्र दत्ता नवनाथ बिरंगळ आणि समाधान बिभीषण भोगल यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तेजस सुनील भिसे असं खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण सुनील भिसे यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तेजस भिसे याने आरोपी मित्र दत्ता बिरंगळ याला मैत्रिणीकडून घेऊन २० लाख ऊसणे दिले होते. मैत्रिणीने फ्लॅटवर कर्ज घेतलं होतं. काही महिन्यांनी मयत तेजसच्या मैत्रिणीकडे बँकांनी तगादा लावला असता तेजसने संबंधित आरोपी दत्ता बिरंगळ याच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र, तो अनेकदा पैसे मागून देखील देत नव्हता. याच व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले होते.
मयत तेजस जुन्या गाड्यांचे खरेदी विक्रीचे काम करायचा. हत्या होण्याअगोदर तेजस बाहेरगावी जातो म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने आरोपी दत्ता बिरंगळ सोबत जात असल्याचे मावस भाऊ नितेशला फोनद्वारे सांगितले. आरोपी दत्ता बिरंगळ आणि समाधान भोगल यांनी मयत तेजसला होंडा सिटी मोटारीतून जामखेड येथे नेऊन रुमालाने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह जाळला.
दरम्यान, आरोपीनेच मयत तेजसच्या मोबाईलवरून व्हाट्सऍपद्वारे मावस भाऊ नितेश ला स्वतः तेजस आल्याचं भासवत होंडा सिटी गाडी काळेवाडी येथे चावीसह सोडल्याचा मेसेज केला. ते तेव्हापासून तेजसशी संपर्क न झाल्याने सोबत असलेल्या दत्ता बिरंगळशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचा फोन बंद येत असल्याने त्याने घातपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मयत तेजसच्या भावाने याची माहिती वाकड पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, आणि आरोपीला अटक केले. आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता तेजसचा खून केल्याची कबुली संबंधित आरोपींनी दिली.