अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजीव जाधव यांची वर्णी लावण्यासाठी त्यांच्या पत्नीच्या मैत्रीचा उपयोग झाला असावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करताना, त्या जागेवर विश्वासातला अधिकारी असायला हवा, असा अजित पवार यांचा आग्रह होता. जाधव आणि पवार यांच्या पत्नींची एकमेकांशी असलेली गाढ मैत्री या नियुक्तीचे कारण ठरल्याची माहिती आता पुढे आली आहे.
नवे आयुक्त राजीव जाधव हे मूळचे मराठवाडय़ातील असून त्यांची पत्नी राजश्री जाधव या उस्मानाबाद येथील आहेत. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि राजश्री जाधव या जिवलग मैत्रिणी आहेत. नेमकी हीच बाब जाधव यांच्या पथ्यावर पडली आहे. पिंपरीच्या आयुक्तपदासाठी जाधव यांची नियुक्ती होण्यासाठी ही मैत्री उपयोगी पडली असावी, असा तर्क आता लढवला जात आहे. पिंपरी महापालिका आयुक्तपदी आत्तापर्यंत थेट आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. श्री जाधव हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या श्रेणीतून बढतीने आयएएस श्रेणीत गेल्याचे सांगण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी ही त्यांची पहिलीच महत्त्वाची जबाबदारी होती. त्यानंतर लगेचच देशातील वेगाने वाढत असलेल्या उद्योगनगरीचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती कशी काय झाली, याबद्दल अधिकाऱ्यांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
येत्या निवडणुकीपूर्वीा डॉ. श्रीकर परदेशी यांना हटवणे आवश्यक असल्याचे मत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यापाशी मांडले होते. आता जाधव यांच्याच आयुक्तपदाच्या काळात आगामी लोकसभा निवडणूक होणार असल्याने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थंडावेल, अशी पालिकेतील राज्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
राजकीय दबावाला बळी न पडता पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करणारे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीमागे अजित पवार यांचा आग्रह कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. दीड वर्षांतील प्रभावी मोहिमेमुळे आयुक्त परदेशी हे नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले. मात्र, त्यामुळे अनेकांचे राजकीय हितसंबंध दुखावले गेल्याने परदेशी यांच्या बदलीची मागणी सातत्याने होत होती. सुरूवातीला या मोहिमेला पाठिंबा देणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रवादीने दबाव आणला. त्यापुढे झुकत मुख्यमंत्र्यांना परदेशी यांची बदली करावी लागली. अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारणाऱ्या परदेशी यांचीच फक्त बदली केली असे चित्र निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परदेशी यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा