अवकाळी पावसामुळे आणि साठवणूक झाल्यामुळे कांद्याची आवक कमी झाली ही वस्तुस्थिती असली, तरी व्यापाऱ्यांनी कांदा साठवून ठेवला, अशी परिस्थिती नसल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. कांद्याचे नवे पीक १ नोव्हेंबरपासून बाजारात येईल आणि नंतर कोणी गिऱ्हाईक नाही अशी परिस्थिती होऊन दर कोसळतील, असेही ते म्हणाले.
कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर राज्य शासनाने कारवाई करावी, असे विधान केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले होते. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, कांद्याचे दर शंभर रुपये किलोवर गेल्याच्या बातम्या झळकल्यानंतर मी तातडीने दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार त्यांचे अधिकारी देखील गुरुवारी आले होते. त्यांनी तातडीने खरेदी करावी याबाबतही चर्चा झाली. त्यांना जेवढा हवा असेल तेवढा कांदा पुरवणे शक्य आहे. मात्र, महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी फार मोठय़ा प्रमाणावर कांद्याची साठेबाजी केली ही वस्तुस्थिती नाही. अवकाळी पावसाने कांदा बाजारात कमी आला ही वस्तुस्थिती आहे. व्यापाऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे असे दिसल्यास सरकार निश्चितच कारवाई करेल.
कांद्याची साठवण शेतकऱ्यांना करता यावी यासाठी केंद्र आणि राज्यानेही कांदा चाळी बांधण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. त्यामुळे सधन शेतकऱ्यांनी कांदा साठवणीसाठी चाळी बांधल्या असून चांगला दर मिळेल म्हणून ते कांदा चाळीतून बाहेर काढत नाहीत. त्यामुळे कांदा खराब होईल या भीतीपोटी कांद्याची जी विक्री शेतकरी मोठय़ा प्रमाणात करायचे आणि बाजारात मोठय़ा प्रमाणात कांदा यायचा तशी परिस्थिती आता झालेली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नव्या हंगामातील कांद्याची आवक १ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि त्यानंतर गिऱ्हाईक नाही अशी परिस्थिती होईल. त्यामुळे भावही कोसळतील. दरात वाढ झाली असली, तरी दर कमी होण्यासाठी आता जेमतेम आठवडाभराचाच प्रश्न आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कांद्याचे दर एक नोव्हेंबरनंतर कोसळतील – मुख्यमंत्र्यांचा दावा
कांद्याचे नवे पीक १ नोव्हेंबरपासून बाजारात येईल आणि नंतर कोणी गिऱ्हाईक नाही अशी परिस्थिती होऊन दर कोसळतील, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
First published on: 26-10-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From 1st week of november onion rates will get down cm