क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त िपपरी महापालिकेच्या वतीने ११ ते १४ एप्रिल दरम्यान पिंपरीत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे मुख्य संयोजक म्हणून कार्यकारी अभियंता शरद जाधव, तर सहसंयोजक अशोक गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवारपासून ते १४ एप्रिलपर्यंत कामगार भवनात बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित फोटोप्रदर्शनाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांचे व्यसनमुक्तीवर आधारित व्याख्यान, राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा, प्रवीण येवले यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ‘उपेक्षितांवर होणारे वाढते अत्याचार व माध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, डॉ. बाबुराव गुरव, भैयाजी खैरकर, पार्थ पोळके, ‘लोकसत्ता’ चे मधू कांबळे व पत्रकार रणधीर कांबळे आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
दुसऱ्या दिवशी स्थानिक कलावंतांचा भीमगीतांचा कार्यक्रम, तसेच एचए मैदानावर अरविंद सोनटक्के यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ‘महानायक सम्राट अशोक’ या महानाटय़ाचा प्रयोग होणार आहे. १३ एप्रिलला ‘एल्गार निळ्या पाखरांचा’ हे कविसंमेलन होणार आहे. दुपारी ‘महिला संरक्षण कायदा’ या विषयावर अॅड. संघराज रूपवते मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी शाहिरी जलसाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ‘प्रबुद्ध हो मानवा’ हा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. १४ एप्रिलला सकाळी सहा वाजता ‘निळी धम्म पहाट’ हा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.