प्राणांची बाजी लावून देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकार घेऊन पुण्यातून ५० किलो तिळगूळ रवाना पाठविण्यात आला. ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत जवानांच्या शौर्याला सलाम करीत तिळगुळाचे पूजन करण्यात आले.
शनिवार पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये सैनिक मित्र परिवार आणि मेहुणपुरा गणेशोत्सव मंडळातर्फे भास्करराव काटदरे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात नगरसेविका मुक्ता टिळक, महेश काटदरे, सचिन शिंदे, केशव जोशी, प्रा. संगीता मावळे, शिरीष मोहिते यांच्या हस्ते तिळगुळाचे पूजन करण्यात आले. जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, पूँछ, कच्छ या भागांमध्ये तिळगूळ पाठविण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष होते. हनुमान व्यायाम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, तुळशीबाग मंडळ, पोटसुळ्या मारुती मंडळ, काळभैरवनाथ मंडळ, नवा विष्णू चौक मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ, त्वष्टा कासार मंडळ या मंडळांसह शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशन यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. मनोज लोखंडे, कुमार रेणुसे, पीयूष शहा, रमेश परचुरे, बाप्पू प्रसादे या वेळी उपस्थित होते आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पंडित यांनी आभार मानले.