पुणे : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदमुळे फळभाज्यांना फारशी मागणी नसल्याने बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२३ एप्रिल) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळभाज्यांची आवक कमी झाली होती. गुजरात, कर्नाटकमधून मिळून ६ ते ७ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, हिमाचलप्रदेशातून १ टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून २ टेम्पो घेवडा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून मिळून तोतापुरी कैरी ४ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाटा आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा – पुणे : उकाडा वाढल्याने बाजारात खरबूज, कलिंगडला मागणी
पुणे विभागातून सातारी आले ७०० ते ८०० गोणी, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पाे, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, मटार १०० गोणी, कांदा १०० ते ११० ट्रक अशी आवक झाली.
हेही वाचा – एमपीएससी उमेदवारांचा डेटा लीक झाल्यानंतर काँग्रेसने केली ‘ही’ मागणी
पालेभाज्यांचे दर स्थिर
अवकाळी पावसामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक कमी झाली. पालेभाज्यांना फारशी मागणी नाही. पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी तरकारी विभागात एक लाख कोथिंबिरीच्या जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली.