पर्यावरण, फुलाफळांची लागवड, बागांची जोपासना, फुलांची सजावट आदी गोष्टींची मनापासून आवड असणाऱ्या पुणेकरांसाठी पर्वणी ठरणारे महापालिकेचे फळाफुलांचे प्रदर्शन शनिवारपासून (१६ फेब्रुवारी) सुरू होत असून त्यातील प्रदर्शन आणि स्पर्धा गटामध्ये यंदा दोन हजार पुणेकर सहभागी झाले आहेत.
महापालिकेचे उपायुक्त सुनील केसरी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. नागरिकांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे यंदा ३३ वे वर्ष आहे. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त हे प्रदर्शन संभाजी उद्यानात दरवर्षी भरवले जाते. नागरिकांसाठी विविध विषयांवरील स्पर्धा, विविध रोपवाटिकांचे प्रदर्शन, बागांसंबंधीच्या साहित्याची रास्त दरात विक्री, विविध कल्पनांवर आधारलेल्या भव्य सजावटी, निसर्ग चित्र, छायाचित्र, व्याख्याने हे यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ असल्याचे केसरी यांनी सांगितले.
पानाफुलांच्या रचना, रांगोळ्या, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, गजरे, हार, वेण्या, कुंडय़ांमधील फुलझाडे, फळे, घरगुती बागेतील भाजीपाला आदी १२ गटांमधील स्पर्धेत यंदा दोन हजार पुणेकरांचा सहभाग आहे. प्रदर्शनाच्या तयारीसाठी उद्यान विभागाचे दोनशे ते अडीचशे कर्मचारी गेले आठ दिवस आपापल्या उद्यानातील काम सांभाळून झटत असून फुलांच्या रचनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्कर्णी, तसेच इकाबाना, पर्यावरणाच्या क्षेत्रातील अॅलर्ट आदी संस्थांचाही सहभाग प्रदर्शनात आहे.
बागांसाठी लागणारे साहित्य, खते, बी-बियाणे, अवजारे, रोपे आदींच्या विक्रीचे शंभर स्टॉल प्रदर्शनात असून प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता महापौर वैशाली बनकर आणि निवृत्त उपायुक्त भानुदास माने यांच्या हस्ते होईल. महापालिकेचे माजी उद्यान विभाग प्रमुख यशवंत खैरे यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी होईल. शनिवारी रात्री आठपर्यंत तसेच रविवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वासाठी नि:शुल्क खुले राहील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा