पुणे : जेमतेम २०० कुटुंबे, १३०० लोकसंख्या. एकूण १७१६ हेक्टर जमिनीपैकी १३४५ हेक्टर डोंगराळ जमीन. लागवडीयोग्य ३७१ हेक्टरपैकी २७५ हेक्टरवर २०हून अधिक फळांची लागवड. या फळशेतीतून वर्षांला तब्बल २५ कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल, असे आशादायी चित्र आहे सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी या राज्यातील पहिल्या फळांच्या गावाचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फलटण तालुक्यातील धुमाळवाडीने राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून नावलौकिक मिळवला आहे. धुमाळवाडीने राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांसमोर अत्याधुनिक शेतीचा नवा आणि शाश्वत पर्याय निर्माण केला आहे. डोंगरात वसलेल्या धुमाळवाडीत फळबागांसाठी पोषक वातावरण आणि हलकी जमीन आहे. अनुकूल नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती असलेल्या धुमाळवाडीत १९८०पासून डाळिंबाची लागवड होत आहे. १९९०नंतर फळबाग लागवडीने गती घेतली. प्रामुख्याने डाळिंबाचीच लागवड होत होती. पण, तेल्या आणि मर रोगामुळे डाळिंबाचे नुकसान झाले आणि शेतकरी अन्य पिकांकडे वळाले.

हेही वाचा >>>‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला लाभ द्या; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

आता द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, अंजीर, केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, चिकू, लिंबू, संत्री, नारळ, आंबा, पपई, लिची, सफरचंद, अॅपल बोर आणि विविध प्रकारच्या बेरी अशा सुमारे २० प्रकारच्या फळबागांची लागवड गावात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना सरळ लागवड शक्य नाही, त्यांनी शेतजमिनीच्या बांधावर सफरचंद, काजू, लिची, मोसंबी, फणस, करवंद, बोर, खजूर, ब्लॅकबेरी, तुती, स्टार फ्रूट, वॉटर अॅप्पल अशा विविध फळांची लागवड केली आहे.

गावातील सर्व शेतीसाठी ठिबक सिंचनाची सोय आहे. फळांचा दर्जा, गुणवत्ता व उत्तम चव यामुळे धुमाळवाडीतील फळांना बाजारपेठेत मागणीही आहे. काही शेतकरी सेंद्रीय पद्धतीने फळांचे उत्पादन घेत आहेत. उत्पादित फळांची बांधावरच थेट विक्री होत आहे. प्रतिवर्षी फळबागेच्या माध्यमातून येथे सुमारे २५ कोटींची उलाढाल होते. आता उत्पादित फळांवर प्रक्रिया करण्यासाठी गावातील शेतकरी गट, वैयक्तिकरीत्या तरुण पुढे येत आहेत.

हेही वाचा >>>रामोशी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

धुमाळवाडीत सुमारे २५८ हेक्टरवर फळबागा आहेत. आता सरकारने फळांचे गाव म्हणून जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. यापुढे उत्पादन वाढीसह प्रक्रिया उद्योगाला चालना देणार आहोत. – रेखा धुमाळ, उपसरपंच, धुमाळवाडी

गावातील ७० टक्के तरुण फळशेती करतात. फळशेतीत नवनवे प्रयोग करीत आहोत. कृषी विभागाकडून फारसे मार्गदर्शन, सहकार्य मिळत नाही. गावातील शेतकरी सरकारी अनुदानाच्या मागे धावत नाहीत. – संजय धुमाळ, शेतकरी, धुमाळवाडी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fruit village dhumalwadi produces more than 20 types fruits amy
Show comments