महापालिकेकडून जादा बांधकामाचे लाभ मिळवणारी सर्व मोठी रुग्णालये फक्त सवलतीचाच लाभ लाटत असून त्या मोबदल्यात गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याच्या अटीचे रुग्णालयांकडून पालन होत नसल्याचे उघड झाले आहे. ही योजना गरजूंना समजू नये, अशीही काळजी महापालिकेचे अधिकारी घेत असल्याची तक्रार सोमवारी आयुक्तांकडे करण्यात आली.  
गरीब रुग्णांना काही खाटा उपलब्ध करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्याच्या अटीवर शहरातील काही रुग्णालयांना महापालिकेने बांधकामासाठी जादा एफएसआय दिला आहे. जादा एफएसआय घेऊन ज्या रुग्णालयांनी सवलतीचा लाभ घेतला त्यांनी गेल्या तीन वर्षांत किती गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले, याची माहिती ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी माहिती अधिकार दिनात सोमवारी घेतली. गेल्या तीन वर्षांत या रुग्णालयांनी नियमानुसार नऊ हजार ८०० गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे आवश्यक असताना या रुग्णालयांनी तीन वर्षांत महापालिकेने शिफारस केलेल्या फक्त १७० रुग्णांवर उपचार केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोणकोणत्या रुग्णालयांमध्ये अशाप्रकारे उपचार होतात, याची माहिती महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये लावावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने डिसेंबर २०१३ मध्ये केली होती. मात्र, आरोग्य प्रमुखांनी त्याची दखल न घेता ही योजना गरिबांपर्यंत पोहोचू नये अशी व्यवस्था जाणीवपूर्वक केली आहे, अशी लेखी तक्रारही सजग नागरिक मंचने सोमवारी आयुक्तांकडे केली आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचार योजनेच्या लाभापासून वंचित न ठेवता या योजनेची माहिती देणारे फलक पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये तातडीने लावावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader