‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मधील वर्ग त्वरित सुरू करावेत, अशी मागणी करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शनिवारी निदर्शने करण्यात आली. या मागणीचे निवेदन संचालक प्रशांत पाठराबे यांना देण्यात आले असून संप मागे घेऊन विद्यार्थ्यांनी अन्य लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि काही सदस्यांच्या निवडीला विरोध करीत काही विद्यार्थ्यांनी गेल्या ४५ दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे संस्थेतील अध्यापनाचे काम ठप्प झाले आहे. केंद्र सरकार प्रत्येक विद्यार्थ्यांमागे लाखो रुपये खर्च करीत आहे. असे असताना काही विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सामान्य करदात्याचा पैसा हकनाक वाया जात असून विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे संस्थेतील वर्ग त्वरित सुरू करावेत, अशी मागणी अभाविपने संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली असल्याचे महानगर संघटनमंत्री प्रदीप गावडे यांनी दिली.
एफटीआयआयमधील वर्ग सुरू करण्यासाठी अभाविपने एफटीआयआय प्रशासनाला एक आठवडय़ाची मुदत दिली आहे. हे वर्ग सुरू न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

                                                                                          (संग्रहित छायाचित्र)

Story img Loader