संपाच्या पहिल्या दिवसापासून ‘गो बॅक गजेंद्र चौहान’च्या घोषणा देणाऱ्या ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी जुलैमध्ये शासनाला लिहिलेल्या प्रस्तावपत्रात मात्र चौहान यांना हटवण्याची सूचना कुठेही न करता त्यांना केवळ नामधारी म्हणून नेमा असे सुचवले आहे. एफटीआयआय सोसायटीवरील आक्षेप घेतल्या गेलेल्या पाच सदस्यांपैकी देखील केवळ तीन सदस्यांना बदलण्याची सूचना विद्यार्थ्यांनी ३१ जुलैला पाठवलेल्या पत्रात केली असून नवीन येणारे सदस्य दोन्ही पक्षांना पटणारे (म्युच्युअली अ‍ॅग्रीएबल) असावेत, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या कागदपत्रांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी विकास अर्स यांनी संचालक प्रशांत पाठराबे यांना पाठवलेले पत्र व विद्यार्थ्यांनी संपावर सुचवलेल्या उपायांचा प्रस्ताव यांचा समावेश आहे. या प्रस्तावात विद्यार्थ्यांनी एफटीआयआय सोसायटीवरील केवळ अनघा घैसास, नरेंद्र पाठक व राहुल सोलापूरकर यांना बदला आणि त्यांच्या जागी दोन्ही पक्षांना मान्य होतील, असे सदस्य नेमा असे सुचवले आहे. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी या तीन नावांसह शैलेश गुप्ता आणि काही काळासाठी प्रांजल सैकिया यांच्यावरही आक्षेप घेतला होता. मात्र त्यांना बदलण्याचा उल्लेख विद्यार्थ्यांच्या प्रस्तावात नाही. चौहान यांना हटवण्याची मागणी न करता विद्यार्थ्यांनी एफटीआयआय सोसायटीच्या सदस्यांमधून एक उपाध्यक्ष नेमा व अध्यक्षांचे सर्व अधिकार या उपाध्यक्षांना देऊन चौहान यांना केवळ नामधारी ठेवा असे म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर सोसायटीच्या सदस्य पदाचा राजीनामा देणाऱ्या जाहनू बरुआ, पल्लवी जोशी व संतोष सिवन यांच्या जागीही दोन्ही पक्षांना पटणारे नवे सदस्य नेमा असे विद्यार्थ्यांनी पत्रात लिहिले आहे. संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी संस्थेत ‘मेंटॉर’ किंवा शैक्षणिक अध्यासन निर्माण करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या पदावरील व्यक्तीने विद्यार्थी, शिक्षक व इतरांशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्यावेत असेही नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader